Edition

पुण्यात सोमवारी रासपच्या ‘युवा जोडो संकल्प अभियाना’चा शुभारंभ; महादेव जानकर यांची प्रमुख उपस्थिती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे/प्रतिनिधी:
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक आणि महाराष्ट्रव्यापी ‘युवा जोडो संकल्प अभियाना’ची शुभारंभ सभा सोमवार, २७ जुलै रोजी दुपारी ०१:०० वाजता पुणे येथील पत्रकार भवन येथे संपन्न होणार आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मुख्य उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती रासपच्या वतीने देण्यात आली.
पत्रकार भवन येथे महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम प्रदेश कार्यकारिणीची बैठक होईल. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते आणि प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या बैठकीत राज्यातील सद्यस्थितीतील ज्वलंत विषय आणि पक्ष संघटनेच्या मजबुतीसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.
कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष अजित पाटील यांच्या ‘युवा जोडो संकल्प अभियाना’चा अधिकृत शुभारंभ जानकर व वरिष्ठ प्रदेश नेत्यांच्या उपस्थितीत केला जाईल. अजित पाटील हे या अभियानांतर्गत ३६ दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून राज्यातील नवीन युवकांना पक्षाशी जोडणे, त्यांना कामाची संधी देणे आणि युवकांच्या स्थानिक समस्या समजून घेणे, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.
या सोहळ्यादरम्यान पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातील सर्व आघाड्यांच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!