शिराळा, प्रतिनिधी : डोंगरी शिराळा तालुक्यातील नागरिकांच्या दळणवळणाच्या अडचणी दूर करण्यासाठी शिराळा एसटी आगाराला आणखी दहा मिनी बस उपलब्ध होणार असून, त्यासंदर्भातील मंजुरी अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती आमदार सत्यजित देशमुख यांनी दिली. शिराळा आगारात नव्याने दाखल झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ या पाच नवीन एसटी बसांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी खासदार धैर्यशील माने, नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, माजी सभापती हणमंतराव पाटील, उपनगराध्यक्ष बसवेश्वर शेटे, सम्राट शिंदे, सुखदेव पाटील, यंत्र अभियंता सुकन्या साठे, आगार व्यवस्थापक धन्वंतरी ताटे, प्रवीण पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
आमदार देशमुख म्हणाले की, शिराळा आगारात आतापर्यंत १९ नवीन बसेस सेवेत दाखल झाल्या असून, लवकरच आणखी दहा मिनी बस उपलब्ध होतील. डोंगरी व दुर्गम भागातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि वेळेवर प्रवासाची सुविधा मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. शिराळा आगार जिल्ह्यातील आदर्श आगार म्हणून विकसित व्हावे, यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, शिराळा तालुक्याला आमदार सत्यजित देशमुख यांच्यासारखे विकासाभिमुख नेतृत्व लाभल्याने विविध विकासकामांना गती मिळाली आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार म्हणून आपणही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास नगरसेवक अवधूत गायकवाड, राजसिंह पाटील, सचिन डांगे, रमेश कांबळे, अभिजित यादव, सचिन नलवडे, अभिजित शेणेकर, पंचायत समिती सदस्य बाजीराव पाटील, उत्तम निकम, अनिता धस, निलेश आवटे, राजू पाटील, विद्याधर कुलकर्णी, विनोद कदम आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत आगार व्यवस्थापक धन्वंतरी ताटे यांनी केले, तर आभार सतीश सुतार यांनी मानले.











