शिराळा प्रतिनिधी – शिराळा तालुक्यात इतरत्र पावसाचा जोर मंदावला असला तरीही चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन..चार दिवसापासून अतिवृष्टी सुरूच आहे. गेल्या २४ तासात चांदोली धरण परिसरात ११८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून १८८७१ हजार क्यूसेक्स पाण्याची आवक होत असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या २४ तासात झपाट्याने वाढ झाली आहे.
यावर्षी चांदोली धरण क्षेत्रात पावसाचं उशिरा परंतू दमदार आगमन झाले असून गेल्या तीन..चार दिवसापासून जोरदार अतिवृष्टी सुरू आहे. आज मंगळवार सकाळी सहा वाजेपर्यंत चांदोली धरण परिसरात पडणाऱ्या पावसाने ६६८ मिलिमीटरचा टप्पा पार केला. या मुसळधार पावसामुळे वारणा नदीचे पाणी पात्र बाहेर पडले आहे. नदीच्या पाणी पातळीतील कमालीची वाढ होत असून वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडून नदीकाठच्या पोटमळीत शिरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास वारणा नदीकाठची शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे चांदोली धरण प्रशासनाकडून वारणा नदीकडच्या गावातील नागरिकांना सावधातेचा इशारा देण्यात आला आहे. चांदोली धरण परीसरात मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल ११८ मिलीमीटर अतिवृष्टीसह आज अखेर ६६८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे तसेच चांदोली धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणाऱ्या पाथरपुंज येथे तब्बल १९० मिलिमीटर इतकी अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत ही कमालीची वाढ होत असून सध्या चांदोली धरणाची पाणी पातळी ६०२.३७ पोहचली आहे सध्या धरणात ४५९.३६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४७.१५ म्हणजे १६.२२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास बंद असणारे वीज निर्मिती केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे.











