
ठाणे वृत्तसेवा : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यावर त्याच्याच सख्ख्या आईने अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाच्या अंगावरील जखमा, चटक्यांच्या खुणा आणि त्याने स्वतः सांगितलेल्या व्यथेनंतर परिसरात संताप व्यक्त होत आहे.
किसान नगर येथील शाळा क्रमांक ३ मध्ये शिकणारा हा चिमुकला आजीसोबत शिवसेना मध्यवर्ती शाखेत आला होता. त्याच्या पाठीवर, हातापायांवर जखमा व चटक्यांच्या खुणा पाहून शाखाप्रमुख सुनील मोरे यांनी विचारपूस केली. त्यावेळी मुलाने, “मम्मी मला रोज मारते, जेवण देत नाही, गरम चाकूने चटके देते आणि गळा दाबते,” अशी धक्कादायक माहिती दिली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.
घटनेची गंभीर दखल घेत सुनील मोरे व महिला पदाधिकाऱ्यांनी संबंधित महिलेला वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आणले. पीडित बालकाच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आईला अटक केली आहे. या घटनेने बालकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.











