Edition

दापुरी खुर्द शेतशिवारातील पांदण रस्त्याची दुरवस्था; शेतकऱ्यांचा संताप, दुरुस्तीची मागणी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा प्रतिनिधी : संतोष भालेराव, वाशिम : रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द येथून गोवर्धनकडे जाणारा शेतशिवारातील मुख्य पांदण रस्ता पावसाळ्यात अत्यंत धोकादायक बनला असून, पाणी साचणे, गाळ व चिखल यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना अनेक शेतकऱ्यांचे पाय चिखलात रुतून पडण्याच्या घटना घडत असून, मोटारसायकलस्वार शेतकऱ्यांचेही वारंवार अपघात होत असल्याचे समोर आले आहे.
दापुरी खुर्द परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा एकमेव मुख्य पांदण रस्ता असून दुसरा कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे दररोज शेतीच्या कामासाठी या रस्त्याचाच वापर करावा लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पांदण रस्त्यालगत असलेल्या काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पावसाचे पाणी थेट रस्त्यावर सोडल्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याचा काही भाग चांगल्या स्थितीत असला तरी उर्वरित भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचत असून त्यानंतर संपूर्ण रस्ता चिखलमय बनतो. परिणामी शेतात ये-जा करणे अत्यंत कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून पांदण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी तहसीलदार कार्यालय, रिसोड येथे लेखी तक्रार अर्ज देण्यात आले आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दापुरी खुर्द शेतशिवारातील सर्व पांदण रस्त्यांची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी गावातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!