पलूस प्रतिनिधी : नागठाणे (ता. पलूस) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा विश्रामबाग, सांगली येथील वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजचे कर्मचारी श्री. पोपटराव महादेव देसाई यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावरील ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाजरत्न पुरस्कार – २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र व जागृती नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनात झालेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात खासदार श्रीमंत शाहू महाराज व विधान परिषदेचे गटनेते मा. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते मानाचा फेटा, शाल, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन श्री. देसाई यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष मा. सुरेशजी केसरकर, कामगार आयुक्त तसेच राज्यातील ३६ जिल्ह्यांतील पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्री. देसाई यांनी नोकरी सांभाळत अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांत सक्रिय योगदान दिले आहे. यापूर्वीही त्यांना ‘कोरोना योद्धा’ आणि ‘राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार’ यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल नागठाणे परिसरासह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्याचा सर्वत्र गौरव केला जात आहे.











