शिराळा : सांगली जिल्ह्यातील शिराळा व वाळवा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करून शेतकरी व नागरिकांना शासनाच्या दुष्काळी सवलती व उपाययोजनांचा तातडीने लाभ द्यावा, अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली आहे.
यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने शिराळा व वाळवा तालुक्यांतील शेतकऱ्यांना पेरणी उशिरा करावी लागली. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून, भरणीच्या महत्त्वाच्या अवस्थेत पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर दोन्ही तालुक्यांतील वस्तुस्थितीचा तातडीने आढावा घेऊन दुष्काळग्रस्त म्हणून घोषणा करावी, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे. तसेच जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीजबिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमीची कामे सुरू करणे, आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा, शेतीपंपांची वीजजोडणी खंडित न करणे, अन्नधान्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा आणि जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करणे या उपाययोजना लागू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
शिराळा व वाळवा तालुक्यांतील शेतकरी आणि नागरिकांना या संकटातून दिलासा मिळावा, यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आमदार सत्यजित देशमुख यांनी म्हटले आहे.











