कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी दगडु चंद्राप्पा कुंभार (वय ५२) यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महानगरपालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे आंतरजिल्हा बदलीवर कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या शाळेत रुजू झाले होते. त्यांचा थकीत पगार व पगारातील फरक मंजूर करून देण्यासाठी प्रशासन अधिकारी दगडु कुंभार यांनी सुरुवातीला ४० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदारांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपी अधिकाऱ्याने आंतरजिल्हा बदलीसंदर्भातील नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी यापूर्वीच १० हजार रुपये स्वीकारल्याची कबुली दिल्याचे निष्पन्न झाले. तसेच थकीत पगार व पगारातील फरक काढून देण्यासाठी तडजोडीअंती २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचेही स्पष्ट झाले.
यानंतर एसीबीने सापळा रचला. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रशासन अधिकारी दगडु कुंभार यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने, सुधीर पाटील, माजी पोलीस हेड कॉन्स्टेबल संगीता गावडे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील, रविंद्र पाटील तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत दावणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
दरम्यान, लाचेची मागणी अथवा अपसंपदेबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२०२१ किंवा हेल्पलाईन क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.











