
सांगली प्रतिनिधी : बोरगाव येथील श्री. संजय नंदा सुभाष वाटेगावकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब या पदावर करण्यात निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री.संजय वाटेगावकर हे यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये सहाय्यक अधीक्षक या पदावर कार्यरत होते. शासकीय सेवेतील अनुभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षा व निवड प्रक्रियेत यश संपादन केले.
याबाबत बोलताना श्री. संजय वाटेगावकर म्हणाले, ”महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रशासकीय अधिकारीपदी निवड होणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या यशामागे माझे कुटुंबीय, मित्रपरिवार, थोरामोठ्यांचे आशीर्वाद व प्रोत्साहन तसेच वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात अधीक्षक म्हणून काम करताना मिळालेल्या अनुभवाचा मला या यशासाठी निश्चितच उपयोग झाला. प्रशासकीय अधिकारी म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागात काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी जबाबदारीची बाब असून, या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा माझा प्रयत्न राहील.’
त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत असून, पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.








