मुरगूड : प्रतिनिधी
मुरगूड शहरातील सूर्यवंशी-मांगोरे कॉलनी परिसरातील गेल्या तब्बल ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मंजूर विकास आराखड्यातील १५ मीटर रुंदीच्या डी.पी. रस्त्यावरील अतिक्रमण अखेर मुरगूड नगरपरिषदेने जेसीबीच्या साहाय्याने हटविले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, अनेक वर्षांपासून रखडलेल्या सार्वजनिक रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. विशेष म्हणजे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राठोड साहेब यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधताच दुसऱ्याच दिवशी नगरपरिषद प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाई केली. पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे (दादा) यांच्या पुढाकाराने झालेल्या या पाठपुराव्याची परिसरात चर्चा होत आहे.
मुरगूड शहराच्या मंजूर विकास आराखड्यामध्ये सूर्यवंशी-मांगोरे कॉलनी परिसरासाठी १५ मीटर रुंदीचा डी.पी. रस्ता आरक्षित आहे. मात्र, गेल्या ३५ वर्षांपासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. सार्वजनिक वापरासाठी नियोजित असलेल्या या रस्त्याच्या जागेत अलीकडेच तारांचे कुंपण उभारण्यात आल्याने नागरिकांच्या येण्या-जाण्याचा मार्ग अडथळ्यात सापडला होता. परिणामी, परिसरातील रहिवाशांना दैनंदिन वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच नगरपरिषदेची कचरा संकलन करणारी वाहने यांना ये-जा करताना अडथळे निर्माण होण्याची शक्यता होती.
या गंभीर समस्येबाबत परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करून नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मंजूर विकास आराखड्यातील रस्ता प्रत्यक्षात खुला व्हावा, सार्वजनिक रस्त्यावरील अडथळे दूर व्हावेत आणि नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतुकीची सुविधा मिळावी, अशी नागरिकांची मागणी होती. मात्र, अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत होती.
दरम्यान, या प्रश्नाला गती देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हा सचिव सतीश माळगे (दादा) यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सूर्यवंशी-मांगोरे कॉलनीतील डी.पी. रस्त्याची वस्तुस्थिती, अतिक्रमणामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि सार्वजनिक रस्त्याच्या वापरावर निर्माण झालेला अडथळा याबाबत सविस्तर माहिती दिली. गेल्या ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न तातडीने मार्गी लावून संबंधित अतिक्रमण हटविण्याची मागणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रश्नाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुरगूड नगरपरिषद प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित कुंपणधारकास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम (एम.आर.टी.पी. ॲक्ट) अंतर्गत कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर नगरपरिषदेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन जेसीबीच्या साहाय्याने डी.पी. रस्त्यावरील तारांचे कुंपण हटविले.
या धडक कारवाईमुळे अनेक दिवसांपासून रस्त्यावर निर्माण झालेला अडथळा दूर झाला असून, परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नावर अखेर प्रशासनाने प्रत्यक्ष कृती केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या कारवाईवेळी मुरगूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज, नगररचना सहाय्यक ऋषिकेश पाटील, नगर अभियंता प्रदीप देसाई यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शहराच्या मंजूर विकास आराखड्यातील रस्ते केवळ कागदावर आरक्षित राहून चालणार नाहीत, तर ते प्रत्यक्षात नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध होणे आवश्यक आहे. सूर्यवंशी-मांगोरे कॉलनीतील नागरिकांनी अनेक वर्षांपासून या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठविला. त्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हा सचिव सतीश माळगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिलेल्या पाठपुराव्याची जोड मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी झालेली नगरपरिषदेची कारवाई ही नागरिकांच्या एकजुटीची आणि प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याची फलश्रुती मानली जात आहे.
या कारवाईचे सूर्यवंशी-मांगोरे कॉलनीतील नागरिकांनी स्वागत केले असून, मुरगूड नगरपरिषदेने दाखविलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. शहरातील इतर मंजूर विकास आराखड्यातील रस्त्यांवरील अडथळेही नियमानुसार दूर करून सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे.








