Edition

कोरेगाव ग्रामपंचायतीकडून कृषिकन्यांचे उत्साहात स्वागत!. ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांचे कोरेगाव (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत या कृषिकन्या गावात दाखल झाल्या असून, आगामी काही आठवडे त्या गावात मुक्कामी राहून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणार आहेत.
या उपक्रमांतर्गत कृषिकन्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेणार आहेत. तसेच पीक नियोजन, माती परीक्षण, खत व पाणी व्यवस्थापन, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि कीड-रोग नियंत्रण याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
कोरेगाव ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित स्वागत समारंभात ग्रामविकास अधिकारी संग्राम पाटील यांच्या हस्ते कु. समृद्धी देवकर, कु. मधुरा देशमाने, कु. महेक जमादार, कु. समृद्धी गुरव आणि कु. सानिका गवळी या कृषिकन्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामविकास अधिकारी संग्राम पाटील म्हणाले, की या उपक्रमामुळे कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना ग्रामीण भागातील शेतीचे वास्तव आणि शेतकऱ्यांच्या समस्या जवळून समजून घेण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळून शेतीच्या ज्ञानात भर पडणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून कोरेगाव परिसरात आगामी काळात विविध कृषी विषयक प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!