वार्ताहर : अनिलकुमार डेक्कण्णावर, सदलगा
सदलगा : ऊसाला प्रतिटन ४५०० रुपये दर आणि त्यावर कर्नाटक सरकारने १००० रुपये बोनस असे एकूण ५५०० रुपये दर द्यावा, तसेच केंद्र सरकारने एमएसपी ३० रुपयांवरून ६० रुपये करावी, या मागणीसाठी गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलनाची सरकारसोबतची चर्चा फिस्कटल्याने आज सदलग्यात रास्ता रोको करण्यात आला.
चुनाप्पा पुजारी आणि शशिकांत पडसलगी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सदलगा शहरातील सर्व दुकाने बंद ठेवून कर्नाटक बंदला पाठिंबा दर्शविला.
या आंदोलनात सदलग्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, पौरसभेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, कर्नाटक रक्षणा वेदिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्ते, शेतकरी नेते, व्यापारी वर्ग, पत्रकार बांधव आणि सदलग्यातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन बंद यशस्वी केला.








