

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
डॉ. संजय रोडगे यांच्या पुढाकारातून धार्मिक-सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
सेलू : कृषी उत्पन्न बाजार समिती, सेलूचे सभापती डॉ. संजय रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रवळगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आई महोत्सवा’अंतर्गत महिलांसाठी मंठा देवी दर्शन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आज डीग्रसवाडी, पावडे हादगाव, वाकी, पिंपरुळा, बरसाले डीग्रस आणि शिराळा येथील सुमारे ४०० महिलांनी मंठा देवीचे दर्शन घेतले.गेल्या सात वर्षांपासून या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना देवीच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. दर्शनानंतर महिलांना प्रसादरूपाने फराळाचे वाटप करण्यात येते. तसेच प्रत्येक महिलेला भेटवस्तू देण्यात येते. धार्मिक श्रद्धा जपण्यासोबतच महिलांना सामूहिकरीत्या अशा उपक्रमात सहभागी करून घेणे, त्यांच्यात सामाजिक सलोखा वाढविणे आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. “आई महोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून महिलांना एकत्र आणणारा, त्यांची श्रद्धा दृढ करणारा आणि आपल्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारा सामाजिक उपक्रम आहे. महिलांच्या सहभागातून हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात अविरत सुरू राहील,” असे डॉ. आदित्य रोडगे यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील महिलांना धार्मिक स्थळांच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम श्रद्धा, स्नेह, सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे. महिलांचा वाढता सहभाग हे या उपक्रमाच्या यशाचे द्योतक असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.या वेळी जिल्हा परिषद सदस्या डॉ. सविता रोडगे, डॉ. आदित्य रोडगे, कंस मानमोडे (सरपंच, पिंपरुळा), अंकुश शेरे, सदाशिव गिरी, लक्ष्मण शेरे, विष्णू मानमोडे, दिगंबर मानमोडे, किसनराव खेडेकर (शिराळा), सुभाष लोखंडे (हादगाव), विश्वनाथ काष्टे (हादगाव), आबासाहेब काष्टे (हादगाव), विश्वनाथ पावडे (हादगाव), रवी पावडे (हादगाव), कुंडलिक खेडेकर (शिराळा), राहुल गाडेकर (उपसरपंच, डीग्रसवाडी), ज्ञानेश्वर होगे, सिद्धीकी पठाण, बद्रि बरसाले, विलास आठवले आदी मान्यवर उपस्थित होते.









