गांधीनगर:प्रतिनिधी-
उदय साळुंखे
गांधीनगर तालुका करवीर येथे : मुख्य बाजारपेठेतील वाहतुकीच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युवक आघाडीच्या वतीने गांधीनगर येथील गणेश टॉकीज परिसरातील मेन रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी टायर पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला. ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला, तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवाजी इंगवले यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दोन दिवसांत कार्यवाही करण्याची प्रशासनाची भूमिका
गांधीनगर मुख्य बाजारपेठेतील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी तावडे हॉटेल ते चिंचवाड रेल्वे फाटकादरम्यान रस्त्यावर थर्मोप्लास्टिक पेंटने पांढरे पट्टे (लेन मार्किंग) मारावेत, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. हे काम दोन दिवसांत पूर्ण करण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी मेन रोडवर ठिय्या मांडला.
आंदोलनादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवाजी इंगवले आणि शाखा अभियंता अमोल लक्ष्मण कोळे यांच्याकडे मागण्या मांडण्यात आल्या. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुढील दोन दिवसांत शक्य ती कार्यवाही करण्यात येईल, तसेच पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी भूमिका मांडण्यात आली.
उत्तम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवक आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, कोल्हापूर शहर उपाध्यक्ष किरण निकाळजे, आयटी सेलचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अमर कांबळे, करवीर तालुकाध्यक्ष सुभाष कांबळे, गांधीनगर शहराध्यक्ष नितीन कांबळे, अविनाश कांबळे, तानाजी इंगवले, योगेश आजाटे, संस्कार कोठावळे, कुमार भोसले, पिंटू जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कदम यांची मध्यस्थी
आंदोलनाची माहिती मिळताच गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कदम यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी संवाद साधला. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मध्यस्थी केली.
दोन दिवसांत प्रश्न सुटणार का?
गांधीनगर मुख्य बाजारपेठेतील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्यक्षात कोणती कार्यवाही होते, याकडे नागरिक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांत पांढरे पट्टे मारण्याच्या मागणीवर ठोस कार्यवाही होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.









