विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी कारदगा.
कारदगा (ता. निपाणी )येथील कारदगा व पंचक्रोशीतील गावांमधील विजेची वाढती मागणी, वारंवार उद्भवणाऱ्या वीजसमस्या आणि यंत्रमागासह विविध उद्योगांच्या विस्ताराला चालना देण्यासाठी कारदगा येथे २१ कोटी २३ लाख रुपये खर्चाचे ११० केव्ही विद्युत उपकेंद्र उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन करून कामाचा शुभारंभ करण्यात आला असून, येत्या वर्षभरात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पुढील वर्षी नवरात्रोत्सवातील अष्टमीच्या दिवशी उपकेंद्राचे उद्घाटन व्हावे, अशी जनतेची अपेक्षा असल्याचे आमदार शशिकला जोल्ले यांनी सांगितले.
निपाणी मतदारसंघातील यरनाळ, आप्पाचीवाडी आणि कारदगा या तीन ठिकाणी ११० केव्ही क्षमतेची विद्युत उपकेंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी कारदगा येथील उपकेंद्राच्या कामाला सुरुवात झाली आहे. सहकाररत्न, माजी खासदार तथा बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नांतून या प्रकल्पाला मंजुरी मिळाली.
९५ टक्के गावांत २४ तास वीजपुरवठा
आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या की, २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या पुढाकाराने निरंतर ज्योती योजना राबविण्यात आली. त्यावेळी निपाणी मतदारसंघात या योजनेची सुमारे ५० टक्केच कामे पूर्ण झाली होती. त्यानंतर केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नांतून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामुळे मतदारसंघातील सुमारे ९५ टक्के गावांमध्ये २४ तास वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
कारदगा परिसरात यंत्रमाग व्यवसायासह विविध उद्योगधंद्यांचा विस्तार होत असल्याने विजेची मागणी वाढत आहे. नवीन विद्युत उपकेंद्रामुळे परिसरातील वीजपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सौरऊर्जा व शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन
माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सौरऊर्जा, शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. विद्युत उपकेंद्रांच्या परिसरात सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी योजना राबविण्यात येत असून, शेतकरी व नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. बीडीसीसी बँकेच्या माध्यमातून सहा नवीन योजना सुरू करण्यात आल्या असून, हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या माध्यमातूनही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांना सौरपंप खरेदीसाठी तीन टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नाबार्डकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच मका व तांदळापासून इंधननिर्मिती आणि गाजरगवतापासून सीबीजी प्रकल्प उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. शेतीला पूरक व्यवसायांची जोड देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी हेस्कॉमचे अधिकारी शिवाजी खरे, हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे चेअरमन जयकुमार खोत, निपाणी ग्रामीण भाजपचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, अरविंद खराडे, सुमित्रा उगळे आणि सुरेखा घाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी सूरज माळी यांनी स्वागत केले, तर सुदीपसिंह उगळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व संचालक, बिरेश्वर बँकेचे चेअरमन आप्पासाहेब जोल्ले, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशवंत गावडे यांनी आभार मानले.









