कुरळप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये यंदाचा गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि डॉल्बीमुक्त वातावरणात पार पडला. या उत्सवाच्या यशस्वी नियोजनात तसेच गावागावांत शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल कुरळप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटलांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी पोलीस पाटलांच्या कार्याचे कौतुक केले.
गावांमध्ये कायदा-सुव्यवस्था राखणे आणि शांतता समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे यामध्ये पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वाची असते. यंदाच्या गणेशोत्सवात पोलीस पाटलांनी गावागावांत जनजागृती करून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना डॉल्बीचा वापर टाळण्याचे आवाहन केले. त्याला गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे परिसरात ध्वनीप्रदूषण टाळून शांततेत उत्सव साजरा करण्यास मदत झाली, असे भरत पाटील यांनी सांगितले.
‘पोलीस पाटील म्हणजे पोलिसांचे कान आणि डोळे’
ग्रामीण भागात पोलीस पाटील हे पोलिसांचे कान आणि डोळे म्हणून काम करतात. त्यांनी दाखवलेली तत्परता, गणेश तरुण मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामस्थांनी दिलेले सहकार्य यामुळे यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यामध्ये कुरळप पोलिसांना यश मिळाले. या सहकार्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या प्रशस्तीपत्रामुळे पोलीस पाटलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गावातील शांतता, सामाजिक सलोखा आणि एकोपा टिकवून ठेवण्यासाठी यापुढेही पोलीस प्रशासनाला सहकार्य करत राहू, असा विश्वास पोलीस पाटलांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला पोलीस ठाण्यातील पीएसआय माने, पवार, गोपनीय अंमलदार सचिन चौगुले, सचिन धोत्रे, सर्व बीट हवालदार तसेच हद्दीतील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.










