

“भेटू एकदा भेटू…!” असे आश्वासन देणाऱ्या नाना पाटेकरांनी मात्र भेट न घेताच या जगाचा निरोप घेतल्याची भावना काष्ठशिल्पकार अशोक जाधव (चिंचोली) यांनी व्यक्त केली आहे. नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने मन सुन्न झाल्याचे सांगत जाधव यांनी त्यांच्यासोबतच्या अनेक हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा दिला.
बालपणी ‘भालू’, ‘माफीचा साक्षीदार’, ‘अंकुश’ यांसारखे चित्रपट पाहिल्यापासून नाना पाटेकर यांच्या अभिनयाची छाप मनावर पडली. पुढे ‘परिंदा’ आणि ‘प्रहार’ या चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाची वेगळी अनुभूती आल्याचे जाधव यांनी सांगितले.
मुंबईतील डिलाईल रोड परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना बालपणी नानांना प्रथम प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. मात्र, पुढे एक दिवस हेच नाना आपल्या चित्र-शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन करतील, असे स्वप्नातही वाटले नव्हते. शिराळा येथे माजी आमदार मानसिंगभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्र-शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले होते.
या उद्घाटनावेळी रिबीन कापण्यासाठी कात्री आणण्याचे विसरल्याची आठवणही जाधव यांनी सांगितली. त्यावेळी घाबरत-घाबरत त्यांनी “माझ्याकडे कटर आहे, देऊ का?” असे विचारले. त्यावर नाना पाटेकर यांनी दिलखुलासपणे “दे… दे… मी पण चित्रकार आहे. जे. जे. चा विद्यार्थी आहे!” असे म्हणत कटरने रिबीन कापून प्रदर्शनाचे उद्घाटन केले होते.
उद्घाटनानंतर नाना प्रत्येक चित्र आणि शिल्प अत्यंत बारकाईने पाहत होते. पिंपळाच्या जाळीदार पानावरील चित्र पाहताना ते काही क्षण अक्षरशः त्यात रमून गेले. तो प्रसंग आजही आपल्या मनात कायम असल्याचे जाधव यांनी सांगितले.
नाशिक येथील ‘छंदोमयी’ ग्रुपच्या प्रदर्शनातील आणखी एका आठवणीनेही जाधव भारावून गेले. उद्योजक विश्वास ठाकूर यांनी जाधव यांनी रेखाटलेल्या नाना पाटेकरांच्या चित्राचा फोटो नानांना पाठवला होता. त्यावर नानांनी काही क्षणांतच ‘छान’ असा रिप्लाय दिला. एवढेच नव्हे तर ठाकूर यांनी जाधव यांचा मोबाईल क्रमांकही नानांपर्यंत पोहोचवला होता.
यानंतर एका अनोळखी क्रमांकावरून जाधव यांना फोन आला. सुरुवातीला त्यांनी तो फोन घेतला नाही. मात्र, नंतर कॉलर आयडीवर ‘नाना पाटेकर’ हे नाव दिसताच त्यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ त्याच क्रमांकावर फोन केला. पलीकडून नानांचा दमदार आवाज आला— “अशोक, छान केलंस रे ते!”
या फोनवर नाना आणि जाधव यांच्यात मनमोकळा संवाद झाला. शिराळा येथील प्रदर्शनापासूनच्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. फोन ठेवताना नाना पाटेकर यांनी, “भेटू एकदा भेटू…!” असे शब्द उच्चारले होते.
“पण नानाजी, भेटताच न भेटताच निघून गेलात, हे बरे नाही. माझ्यासारख्या छोट्याशा खेडेगावातील कलावंताच्या कलेला तुम्ही दिलेली मनापासूनची दाद ही माझ्या आयुष्याची अमूल्य पूंजी आहे. तुमच्या फोन कॉलच्या रेकॉर्डिंगमधील शब्द यापुढेही मला सतत प्रेरणा आणि ऊर्जा देत राहतील,” अशा भावपूर्ण शब्दांत अशोक जाधव यांनी नाना पाटेकरांना श्रद्धांजली अर्पण केली.
“पडद्यावरचे अभिनेते नाना पाटेकर आम्हाला भेटत राहतील; मात्र काळाच्या पडद्याआड गेलेले संवेदनशील, मनस्वी नाना आता कधीच भेटणार नाहीत,” अशी हळवी भावना व्यक्त करत जाधव यांनी नानांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
— काष्ठशिल्पकार अशोक जाधव, चिंचोली











