

शिराळा प्रतिनिधी – प्रेमविवाह करूनही लग्नात मानपान केला नाही आणि नवीन घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणले नाहीत, या कारणावरून होणाऱ्या सासरच्या मंडळींच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका २४ वर्षीय विवाहितेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाडळी (ता. शिराळा) येथे घडली आहे. या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात पतीसह सासू आणि सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पूजा शिवम पाटील हिने शिवम सुरेश पाटील (रा. पाडळी, ता. शिराळा) याच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाह झाल्यानंतर दि. ७ जून २०२३ पासून सासरच्या मंडळींकडून पूजाचा छळ सुरू झाला. “लग्नात सासरच्या लोकांचा योग्य मानपान केला नाही” आणि “नवीन घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणून दे” या क्षुल्लक कारणांवरून तिच्यावर वारंवार दबाव आणला जात होता.
दि. ७ जून २०२३ ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पती शिवम सुरेश पाटील, सासू सुमित्रा सुरेश पाटील आणि सासरे सुरेश खंडू पाटील (सर्व रा. पाडळी, ता. शिराळा, जि. सांगली) यांनी पूजाचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला. सासरच्या त्रासाला कंटाळून पूजा हिने दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास राहत्या घरात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात गंभीर भाजल्यामुळे तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मृत पूजाचे वडील रवींद्र शामराव शिंदे (वय ५७, व्यवसाय-शेती, रा. नाथरोड, शिराळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासू सुमित्रा पाटील, सासरे सुरेश पाटील आणि पती शिवम पाटील यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.











