
नवी दिल्ली वृत्तसेवा – दि. ५ : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाला किमान पाच हजार रुपये प्रति टन दर मिळावा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील रयत क्रांती संघटना आणि किसान संघर्ष समितीच्या माध्यमातून सुमारे एक हजार शेतकरी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. नोएडा येथे पोलिसांनी शेतकऱ्यांना अडविल्याने त्यांनी तेथेच आंदोलन सुरू केले. दरम्यान, काही शेतकऱ्यांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पाहून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. उसाला किमान पाच हजार रुपये प्रति टन दर मिळावा, तसेच एक टक्का रिकव्हरीसाठी ५०० रुपये प्रति टन दर निश्चित करावा, अशी मागणी त्यांनी केली.
साखरेचा किमान विक्री दर (MSP) सध्याच्या ३१ रुपयांवरून ५० रुपये प्रति किलो करावा आणि इथेनॉलचा दर ७५ रुपये प्रति लिटर करावा, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच २५ किलोमीटरच्या आत असलेल्या दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट काढून टाकावी, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात. शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसताना जीवनावश्यक वस्तू कायद्याचा परिणाम शेतमालाच्या बाजारपेठेवर होऊ नये, तसेच साखरेला या कायद्याच्या कक्षेतून वगळावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
महागाईच्या नावाखाली शेतमालाच्या निर्यातीवर निर्बंध आणले जातात. मध्यमवर्गीयांना स्वस्त अन्नधान्य मिळावे, यासाठी सरकार प्रयत्न करते; मात्र त्याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेतकऱ्यांचा प्रश्न धोरणात्मक चर्चेत मागे पडत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावरही टीका केली. पवार कुटुंबाच्या सहकार क्षेत्रातील भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित करत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति टन दर देण्याची मागणी केली. त्यांच्या या वक्तव्यांमध्ये पवार कुटुंब आणि रोहित पवार यांच्यावर विविध आरोप करण्यात आले;
आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातही जनजागृती करून आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.











