Edition

राजर्षी छ शाहु महाराज विद्यार्थी फौंडेशनचा गांधी जयंती निमित्त वस्त्रदानाचा उपक्रम.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये गांधी विचारांचा जागर, सामाजिक बांधिलकी आणि वस्त्रदानाचा प्रेरणादायी संगम पाहायला मिळाला. शिक्षण केवळ पुस्तकी न राहता त्यातून माणुसकी, सेवा, समता आणि सामाजिक जाणीव निर्माण झाली पाहिजे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.राजर्षी छत्रपती शाहु महाराज विद्यार्थी फौंडेशनच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बा. बा. हुपरे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डेक्कन प्रोसेसचे चेअरमन बापूसाहेब तेरदाळे, अनंत प्रोसेसचे संजय कुलकर्णी, शिवम प्रोसेसचे मारुती पन्हाळकर, श्री शिवहरी उद्योग समूहाचे उद्योजक व व्यवस्थापक तुषार कुठोळे तसेच राधाकन्हेया प्रोसेसचे सौ. व श्री. गोरखनाथ डाके उपस्थित होते.प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर पोवार सर
यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष सुनिल मांगलेकर यांनी शुभेच्छा दिल्या,सदस्य महेश खांडेकर, खजिनदार विजय हावळ, उपाध्यक्ष राजू नदाफ, सदस्य नेताजी बिरंजे,माजी विद्यार्थी वसंत सपकाळे,बसवराज कोटगी,राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक शंकर पोवार यांनी केले. त्यांनी शाळेच्या शैक्षणिक वाटचालीसोबतच सामाजिक उपक्रमांची परंपरा अधोरेखित केली.
गांधींचा विचार म्हणजे माणुसकीचा विचार,स्वदेशी वस्त्र परिधान करावे असा संदेश गांधीजी यांनी दिला.त्या विचाराने माजी विद्यार्थी यांनी वस्त्रदान करीत आहेत.
महासत्ता दैनिकाचे उपसंपादक बसवराज कोटगी यांनी महात्मा गांधींच्या जीवनकार्यावर प्रभावी विचार मांडले. गांधीजींचा स्वातंत्र्यलढा हा केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हता, तर सामान्य माणसाला सन्मानाने जगता यावे, यासाठीचा संघर्ष होता. सत्य, अहिंसा, स्वावलंबन, चरखा, खादी आणि साधी जीवनशैली हे गांधीजींच्या विचारांचे महत्त्वाचे आधारस्तंभ होते. गांधीजींचे विचार भारतापुरते मर्यादित न राहता जगभर पोहोचले असून अनेक देशांत त्यांचे पुतळे उभारले गेले आहेत, असे त्यांनी सांगितले.
वस्त्रदानातून सामाजिक बांधिलकी
उपाध्यक्ष राजू नदाफ यांनी वस्त्रदान उपक्रमाची भूमिका स्पष्ट केली. मा. विकास खारगे साहेब यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या उपक्रमाला विजय हावळ, महेश खांडेकर आणि माजी विद्यार्थ्यांनी मूर्त रूप दिले, असे त्यांनी सांगितले. केवळ ₹१५० रुपयांच्या वस्त्रदानातूनही समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देता येतो. अशा उपक्रमांचा विस्तार झाला तर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल आणि इचलकरंजीच्या सामाजिक प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘जय जवान, जय किसान’चा संदेश
संजय कुलकर्णी यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा संदेश देत देशाच्या विकासात जवान, शेतकरी, कामगार, उद्योजक आणि विद्यार्थी यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
‘या शाळेने दिलेले संस्कार आयुष्यभराची शिदोरी’
माजी विद्यार्थी गोरखनाथ डाके यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देताना भावनिक उद्गार काढले.
“आज या शाळेच्या प्रांगणात उभा असताना मला माझे शालेय दिवस आठवतात. या शाळेने मला दिलेले संस्कार आणि शिकवण माझ्या आयुष्यात दिशादर्शक ठरली,” असे त्यांनी सांगितले.
शाळेतून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी पुढे व्यवसायाच्या क्षेत्रात यश मिळविले. व्यवसायाच्या प्रवासात सद् गुरुंची भेट झाली. आणि अहिंसा, सदाचार व माणुसकीचा मार्ग अधिक दृढ झाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
गांधीजींचा साधेपणा आणि आजची पिढी
बापूसाहेब तेरदाळे यांनी गांधीजींच्या जीवनातील साधेपणाचा संदर्भ देत आजच्या पिढीसमोर सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठेवला.
देश पारतंत्र्यात असताना गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. सामान्य माणसाच्या अंगावर पुरेसे वस्त्र नसताना गांधीजींनी स्वतःच्या जीवनात साधेपणा स्वीकारला. चरखा आणि खादीच्या माध्यमातून स्वावलंबनाचा संदेश दिला. त्यांनी सामान्य माणसाचे दुःख जाणले आणि त्याला आपल्या संघर्षाच्या केंद्रस्थानी ठेवले, असे त्यांनी सांगितले.
१९५७-५८च्या काळातील आठवणी सांगताना त्यांनी ग्रामीण जीवन, शेतावर राहणे, पाटी-पेन्सिलवरचे शिक्षण आणि दिवाळीला मिळणारा खाकी पँट-पांढरा शर्ट यांचा उल्लेख केला. त्या काळात सरकारी शाळांमधून विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळत होती; आज शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे आजच्या पिढीने उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करून समाजासाठी काहीतरी देण्याची भावना जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.
इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाच्या विकासाचा उल्लेख करताना त्यांनी दत्ताजीराव कदम यांनी सहकाराच्या माध्यमातून उभारलेल्या उद्योगपरंपरेचे योगदान अधोरेखित केले. इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाने शहराला देशाच्या नकाशावर विशेष स्थान मिळवून दिले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वस्त्रदान करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन त्यांनी केले.
‘शाळेने दिले, आता शाळेला देण्याची वेळ’
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वसंत सपकाळे यांनी आपल्या शालेय आठवणी सांगताना गांधी जयंतीच्या निमित्ताने शाळेत ड्रेस मिळाल्याचे स्मरण केले. त्या काळात शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके मोफत मिळत होती. शाळेने आपल्याला दिलेल्या संस्कारांची परतफेड म्हणून शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी भविष्यातही सदैव सहकार्य करत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अध्यक्षांचे ₹५ हजारांचे योगदान
कार्यक्रमाचे अध्यक्ष बा. बा. हुपरे सर यांनी ₹५,००० ची देणगी देत वस्त्रदान उपक्रमाला प्रोत्साहन दिले. पुढील वर्षीच्या वस्त्रदानासाठीही आपल्या परीने देणगी देण्याची घोषणा त्यांनी केली.
“गांधीजींचे विचार केवळ जयंतीच्या दिवशी आठवून चालणार नाहीत; ते विद्यार्थ्यांच्या आचरणात उतरले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन शाळेचा शैक्षणिक निकाल उत्तम लावावा आणि समाजासाठी जबाबदार नागरिक बनावे,” असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमातून ‘शाळेने आपल्याला दिले, आता आपणही शाळेला आणि समाजाला काहीतरी देऊया’ हा माजी विद्यार्थी व उद्योजकांचा सकारात्मक संदेश ठळकपणे समोर आला.
यावेळी शैलेश मोघे, फौंडेशनचे अध्यक्ष सुनील मांडलेकर, रफिक मुल्ला, नेताजी बिरंजे, गजानन टकले, नारायण शेळके, मुकुंद आडसूळ, इम्तियाज कुडचीकर,यांच्यासह उद्योजक, माजी विद्यार्थी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पी. ए. पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.
गांधी जयंतीचा दिवस केवळ स्मरणाचा न राहता, गरजू विद्यार्थ्याच्या अंगावर वस्त्र आणि मनात आत्मविश्वास देणारा ठरला—हीच या उपक्रमाची खरी प्रेरणा ठरली.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!