गांधीनगर/प्रतिनिधी :
उदय साळुंखे
गांधीनगर करवीर
तालुक्यातील 23 वर्षीय मेहक दिपक चावला या महाविद्यालयीन युवतीचा हातकणंगले तालुक्यातील पेठवडगांव इथं टेम्पोने चिरडल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी एक च्या दरम्यान पेठवडगांव ते कोल्हापूर रोडवर गणपती मंदिर शहर कमानी जवळ घडली.
गांधीनगर इथली मेहक दिपक चावला ही पेठवडगाव इथल्या माने फार्मसी कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकत होती. नेहमीप्रमाणे ती आपल्या क्रमांक MH09 – FS-6268 मोपेड
वरून दुपारी 12 वाजता वडील दिपक यांना कॉलेजला जातो अस सांगून बाहेर पडली होती. ती दुपारी 1 च्या दरम्यान कोल्हापूर पेठवडगांव रोडवरील पेठवडगांव गणपती मंदिर जवळील शहराच्या कमानी जवळ आली असता कोल्हापूर च्या दिशेने जाणाऱ्या भरधाव टेम्पो क्रमांक
MH 42 T 0933 ने समोरून जोराची धडक दिल्याने मेहक चावला या टेम्पोच्या चाकाखाली आल्या. त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन त्या जागीच ठार झाल्या. अपघात होताच नागरिक मोठ्या संख्येने मदतीसाठी धावले. वडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मयत महेक चावला हिच्या आयडेंटी कार्ड वरून तिच्या वडिलांना संपर्क साधला. नातेवाईक घटनास्थळी येताच नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी पारगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघात प्रसंगी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची माहिती मिळताच गांधीनगर मध्ये दुःखाचे सावट पसरले. मेहक याच्या जाण्याने गांधीनगर सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.











