विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी घोसरवाड.
घोसरवाड येथील राहुल शशिकांत लट्ठे यांच्या मालकीचे असणाऱ्या राहुल फोटो स्टुडिओला भीषण बुधवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. या आगीत स्टुडिओतील विविध नामांकित कंपनीचे कॅमेरे, कॉम्प्युटर, प्रिंटर, झेरॉक्स मशीन तसेच अन्य साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीची माहिती मिळताच गुरुदत्त शुगर कारखान्याचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांकडून प्रयत्न करण्यात आले.
फोटो स्टुडिओला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची तीव्रता वाढल्याने स्टुडिओतील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कॅमेरे, कॉम्प्युटर आणि इतर महागडे उपकरणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने स्टुडिओ व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता आहे.
आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे अंदाज घटनास्थळी नागरिक करत होते. या घटनेमुळे घोसरवाड परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आगीचे कारण आणि नुकसानीबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.











