डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी – अखिल भारतीय ग्राहक पंचायत आक्रमक; अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन, दोषींवर कठोर कारवाईची मागणी.
सेलू :- सेलू शहरासह तालुक्यात विक्री होणाऱ्या बाटलीबंद पाण्याची तसेच २० लिटर क्षमतेच्या पाण्याच्या जारची गुणवत्ता, स्वच्छता आणि कायदेशीर अनुपालन तपासण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांनी जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन, परभणी येथील सहाय्यक आयुक्त (अन्न) यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर विषयाची दखल घेऊन सेलू तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
◾पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह!◾
पिण्याचे पाणी हा नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित महत्त्वाचा घटक आहे. सेलू शहर व तालुक्यात विविध उत्पादक आणि विक्रेत्यांकडून बाटलीबंद पाणी तसेच २० लिटरचे जार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र या पाण्याची गुणवत्ता, शुद्धीकरण प्रक्रिया, जारची स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि योग्य साठवणूक याबाबत तपासणी होणे आवश्यक असल्याचे ग्राहक पंचायतने निवेदनात नमूद केले आहे.
◾ FSSAI परवाने आणि पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करा◾
संबंधित उत्पादक व विक्रेत्यांकडे वैध FSSAI परवाना अथवा नोंदणी आहे का, याची पडताळणी करावी. विक्रीसाठी उपलब्ध पाण्याचे अधिकृत नमुने घेऊन मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी करावी. तसेच पाण्याच्या स्रोतापासून शुद्धीकरण, पॅकिंग आणि वितरणापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची तपासणी करावी, पुनर्वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या २० लिटरच्या जारची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, साठवणूक आणि बाटली-जारवरील लेबल, FSSAI क्रमांकासह आवश्यक माहितीचीही पडताळणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे
◾नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी◾
निकृष्ट, दूषित किंवा नियमांचे उल्लंघन करून पाणी विक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधित उत्पादक व विक्रेत्यांवर लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. तसेच नागरिकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवून केलेल्या तपासणीचा आणि कार्यवाहीचा अहवाल अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताला द्यावा, अशी मागणी डॉ. विलास मोरे यांनी केली आहे.
“नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये. ग्राहकांना सुरक्षित पाणी मिळणे हा त्यांचा महत्त्वाचा ग्राहक हक्क असून, प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे,” अशी भूमिका अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने मांडण्यात आली आहे.











