
विशाल क्रांती वृत्तसेवा – बोरगाव येथील जयभवानी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता जयभवानी क्रांती व्यायाम मंडळाच्या हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी सभासदांच्या पाल्यांचा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून संस्थेचा व गावाचा नावलौकिक वाढविणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सभेच्या प्रारंभी संस्थेचे संचालक प्रदीप पाटील यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले. संस्थेचे सचिव विजय पाटील यांनी सभेची नोटीस वाचन केले.
ज्येष्ठ सभासद मुबारक औटी, चेअरमन व संचालक मंडळ यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर संचालक मिलिंद बनसोडे यांनी श्रद्धांजली प्रस्तावाचे वाचन केले. संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर फाणे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. सभेमध्ये मांडण्यात आलेले सर्व ठराव सभासदांनी एकमताने मंजूर केले.
यावेळी विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये मुंबई पोलीसपदी निवड झालेल्या अधिक पाटील, पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झालेल्या दिग्विजय मोरे व कुमार पवार, भूमिअभिलेख विभागात रत्नागिरी येथे कार्यरत असलेल्या तनुश्री पाटील, बोरगावच्या उपसरपंचपदी निवड झालेल्या अनिकेत वाटेगावकर, बोरगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी नियुक्त झालेले विनय देसाई आणि सांगली जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त दीपक चौधरी यांचा समावेश होता.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाळवा तालुका युवक सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे संचालक प्रदीप पाटील यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक माणिकराव पाटील (अण्णा), राजारामबापू बँकेचे उपाध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या हस्ते सर्व सत्कारमूर्तींचा गौरव करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक माणिकराव पाटील (अण्णा), उपाध्यक्ष, राजारामबापू बँक यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संचालक राहुल भोई सर यांनीही मनोगत व्यक्त केले.
सभेला संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











