संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी – चंदगड : तहसील कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना संबंधित सेवेसाठी लागणारी कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, अपेक्षित कालावधी तसेच शासनाने निश्चित केलेले अधिकृत शुल्क याची स्पष्ट माहिती मिळावी, यासाठी तहसील कार्यालयाच्या परिसरात डिजिटल माहिती व शुल्क फलक बसवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मजरे शिरगाव येथील एकनाथ वाके यांनी याबाबत तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तालुक्यातील नागरिक विविध महसूल व शासकीय कामांसाठी मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात येतात. शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी अनेक सेवा ऑनलाइन तसेच सेवा केंद्रांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना काही सेवांसाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया, सेवा मिळण्याचा कालावधी आणि शासनाने निश्चित केलेले शुल्क याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध होत नसल्याने गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते.
तहसील कार्यालयाच्या परिसरात डिजिटल फलकावर विविध शासकीय सेवांची अद्ययावत माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची प्रक्रिया, अपेक्षित कालावधी आणि अधिकृत शुल्क ठळकपणे दर्शविल्यास नागरिकांना मोठी सुविधा मिळू शकते. तसेच कोणत्याही सेवेसाठी अनधिकृत शुल्क आकारले जात आहे का, याबाबत नागरिकांना अधिक जागरूक राहण्यास मदत होईल.
नागरिकांना शासकीय कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व सुलभता मिळावी, तसेच अनावश्यक गैरसमज व गैरसोय टाळता यावी, यासाठी चंदगड तहसील कार्यालयासह संबंधित शासकीय कार्यालयांच्या परिसरात डिजिटल माहिती फलक बसविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.











