कोल्हापूर प्रतिनिधी : “आमची माधुरी आम्हाला परत आणून द्या…” अशी भावनिक हाक देणाऱ्या कोल्हापूरकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कोल्हापूर आणि नांदणी परिसराशी जिव्हाळ्याचे नाते जोडलेल्या लाडक्या माधुरी हत्तीणीची अखेर घरवापसी झाली असून, तब्बल ४८ तासांचा प्रवास पूर्ण करून ती नांदणी येथे दाखल झाली. माधुरीच्या आगमनाने गावात उत्साह, आनंद आणि भावनिक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी गुलाल उधळत तिचे जल्लोषात स्वागत केले.
गुजरातमधील वनतारा रेस्क्यू सेंटरमध्ये माधुरीची देखभाल करण्यात आल्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला पुन्हा नांदणी येथे आणण्यात आले. मुंबई आणि पुणेमार्गे झालेल्या प्रदीर्घ प्रवासानंतर माधुरी रात्री उशिरा नांदणीत पोहोचली. तिच्या आगमनाची बातमी मिळताच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या हत्तीणीचे स्वागत केले.
माधुरीच्या घरवापसीची घोषणा झाल्यापासूनच नांदणी परिसरात उत्साहाचे वातावरण होते. गावातील विविध ठिकाणी तिच्या स्वागतासाठी आकर्षक पोस्टर लावण्यात आले होते. तसेच माधुरीच्या देखभालीसाठी सहकार्य केल्याबद्दल वनतारा रेस्क्यू सेंटरचे संस्थापक अनंत अंबानी यांचे आभार मानणारे फलकही नागरिकांनी लावले होते.
माधुरीसाठी नांदणीत विशेष सुविधा
माधुरीच्या पुनर्वसनासाठी नांदणी येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तिच्या आरोग्याचा विचार करून मोकळे वातावरण, मऊ वाळू, विशेष प्रकारचे फ्लोअरिंग, पाण्यात व्यायाम करण्यासाठी जलाशय तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
हत्तींच्या आरोग्यासाठी केवळ अन्न आणि निवारा पुरेसा नसून त्यांच्या पायांची, सांध्यांची नियमित तपासणी आणि आरोग्याचे सातत्याने निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे माधुरीच्या भविष्यातील देखभालीसाठी आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावर विशेष भर दिला जाणार आहे.
वनताराकडूनही माधुरीच्या आरोग्य आणि देखभालीसाठी आवश्यक सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गावकऱ्यांनी या सहकार्याबद्दल वनतारा संस्थेचे आभार व्यक्त केले आहेत. राजू शेट्टी यांनीही वनताराच्या भूमिकेचे कौतुक करत नांदणीमध्ये माधुरीसाठी ‘मिनी वनतारा’ उभारण्यात आल्याचे म्हटले आहे.
देखभालीसाठी कठोर अटी
दरम्यान, माधुरीच्या देखभाल आणि संरक्षणाबाबत हायपावर कमिटीने काही महत्त्वाच्या अटी घालून दिल्या आहेत. माधुरीचा वापर मिरवणुका, परेड, धार्मिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनासाठी करता येणार नाही. तसेच तिचा कोणत्याही प्रकारे भीक मागण्यासाठी वापर करण्यासही बंदी असेल.
१८ वर्षांखालील मुलांना तसेच प्रशिक्षित नसलेल्या व्यक्तींना माधुरीशी शारीरिक संपर्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षणासंबंधी कायदे आणि तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
माधुरी ही कोल्हापूरकरांसाठी केवळ एक हत्तीण नाही, तर नांदणीच्या मातीशी आणि हजारो नागरिकांच्या भावनांशी जोडलेले एक जिवंत नाते आहे. त्यामुळे तिची ही घरवापसी कोल्हापूरकरांसाठी केवळ आनंदाचा क्षण नसून, एका भावनिक नात्याचा पुन्हा झालेला मिलाप ठरला आहे.











