
वाशिम प्रतिनिधी – आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना, महाराष्ट्र राज्य (आयटक) यांच्या वतीने आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी (१५ जुलै) वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यानंतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जेलभरो आंदोलनही करण्यात आले.
आशा सेविका व गटप्रवर्तक या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा महत्त्वाचा घटक असून, नियमित आरोग्य सेवा, लसीकरण, कुपोषण निर्मूलन, संसर्गजन्य रोग नियंत्रण, माता-बाल आरोग्य सेवा आदी विविध जबाबदाऱ्या त्या पार पाडत असल्याचे संघटनेने नमूद केले.
संघटनेने आशा सेविका व गटप्रवर्तकांना निवडणूक (बीएलओ) कामकाजातून मुक्त करावे, मोबदल्याशिवाय अतिरिक्त कामे देऊ नयेत, दहा वर्षांपेक्षा अधिक सेवा केलेल्या गटप्रवर्तकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, तसेच आशा सेविकांना किमान ₹२६,००० आणि गटप्रवर्तकांना ₹३४,००० मासिक मानधन देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी केली.
याशिवाय ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सचिवपदासंदर्भातील अडचणी दूर कराव्यात आणि वाढत्या कामाच्या ताणाचा विचार करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली.
मागण्यांबाबत त्वरित निर्णय घेऊन त्या पूर्ण कराव्यात, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
या आंदोलनात राज्य उपाध्यक्ष कॉ. मुगाजी बुरुड, जिल्हाध्यक्ष हर्षा खडसे, जिल्हा कार्याध्यक्ष वंदना हिरवाळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने आशा सेविका व गटप्रवर्तक सहभागी झाले.











