विशालक्रांती प्रतिनिधी कुरुंदवाड.
स्वागत प्रतिष्ठानच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार व शैक्षणिक साहित्य वितरण समारंभात प्रेरणादायी मार्गदर्शन.
“जो आपले मन जिंकतो तोच हे जग जिंकू शकतो.” असे प्रेरणादायी प्रतिपादन मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी सदस्य प्रा. डॉ. संजय ठिगळे यांनी केले. कुरुंदवाड येथील डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सभागृह (साधना मंडळ) येथे स्वागत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार व शैक्षणिक साहित्य वितरण समारंभात’ ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी त्यांनी “चला, जग जिंकूया…!” या विषयावर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सच्चिदानंद आवटी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपाध्यक्ष डॉ. मनोहर कोरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. मनीषा डांगे या होत्या.
यावेळी लिंगायत समाज ट्रस्ट, कुरुंदवाडचे अध्यक्ष अॅड. देवराज मगदूम, नियोजन मंडळाचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत मोरे, चित्रकार शशिकांत पाटील, जयप्रकाश पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब माळी, माजी उपनगराध्यक्ष ढूंडय्या स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. ठिगळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, मोबाईल, इंटरनेट, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि दूरदर्शनचा वापर जरूर करा; मात्र त्यांचा योग्य आणि विधायक कारणांसाठी वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे ज्ञानवृद्धीचे प्रभावी साधन असून त्याचा योग्य वापर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा आहे. असे ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते बसव प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर कन्या शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थिनींनी प्रार्थना व स्वागतगीत सादर केले. सौ. शोभा परीट, सौ. अर्चना बनछोडे, सौ. सुनिता मगदूम आणि सौ. माणिक आवटी यांनी बसवगीत गायन केले, तर साक्षी व पूजा वडगावे यांनी लिंगाष्टक सादर करून वातावरण भक्तिमय केले.
अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा सौ. मनीषा डांगे यांनी स्वागत प्रतिष्ठानच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करत गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. अॅड. देवराज मगदूम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच इयत्ता दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्वती सचिन बनछोडे हिने केले, तर रघुनाथ माळी यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास अशोक स्वामी, सचिव गणेश कुंभार, स्वप्नील कुंभार, शिवदास फल्ले, अशोक कुंभार, सचिन तोडकर, आर. डी. गायकवाड, प्रा. राजाराम माळी, काडगोंडा पाटील, नगरसेवक दिपक परीट, शंकर मेंगे गुरुजी यांच्यासह समाजबांधव, कुरुंदवाड शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











