इचलकरंजी, प्रतिनिधी : इचलकरंजी महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल येथे मा. विकास खारगे (अप्पर मुख्य सचिव, महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रेरणेने, माजी विद्यार्थी संघ व राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानासाठी भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर निवड झालेले विद्यार्थी शार्दूल मोरबाळे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमास माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वसंत सपकाळे, विद्यार्थी विकास फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील मांगलेकर, हातकणंगले पंचायत समितीच्या दिव्यांग विभाग प्रमुख सौ. वैशाली माने, पी. ए. पाटील, राजू नदाफ, महेश खांडेकर, विजय हावळ,पांडुरंग डंबाळ, रफिक मुल्ला, महाराष्ट्र राज्य शिवराज्याभिषेक समितीचे सदस्य प्रकाश मोरबाळे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पी. ए. पाटील यांनी केले. त्यांनी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम, माजी विद्यार्थी संघाचे व फोंडेशनचे सातत्यपूर्ण सहकार्य, मोटिव्हेशन व्याख्यानमाला आणि अभ्यास गटाच्या कार्याची माहिती दिली.
यानंतर लेफ्टनंटपदी निवड झाल्याबद्दल शार्दूल मोरबाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पालकांचाही सन्मान सौ. वैशाली माने यांच्या शुभहस्ते करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय विद्यार्थी फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील मांगलेकर यांनी करून दिला.
मार्गदर्शन करताना लेफ्टनंट शार्दूल मोरबाळे यांनी आपल्या यशाचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. त्यांनी प्रयागराज येथे झालेल्या पाच दिवसांच्या SSB (Service Selection Board) निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. या प्रक्रियेत मानसिक क्षमता, नेतृत्वगुण, समूहचर्चा, समूहकार्य, अडथळे पार करण्याच्या चाचण्या, वैयक्तिक मुलाखत आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या विविध टप्प्यांवर उमेदवारांची कसून परीक्षा घेतली जाते, असे त्यांनी सांगितले.
मुलाखतीदरम्यान त्यांना बी.टेक. (मेट्रोलॉजी) शिक्षणाविषयी, कोल्हापूरची वैशिष्ट्ये, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य, श्री महालक्ष्मी मंदिराची माहिती, आपण वापरत असलेला मोबाईल, वाहन, त्याची बॅटरी, मायलेज तसेच दैनंदिन जीवनातील विविध विषयांवर अनेक प्रश्न विचारण्यात आल्याचा अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. या प्रश्नांद्वारे उमेदवाराचे सामान्य ज्ञान, उपस्थित बुद्धिमत्ता, निरीक्षणशक्ती, आत्मविश्वास आणि संवादकौशल्याची चाचणी घेतली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले. सुमारे १९o उमेदवारांमधून प्रथम क्रमांकाने निवड होण्याचा मान मिळाल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त, उच्च ध्येय, तसेच आई-वडील व शिक्षकांचा आदर यांचे महत्त्व पटवून दिले.
प्रमुख पाहुण्या सौ. वैशाली माने यांनी मनोगत व्यक्त करत लेफ्टनंट शार्दूल मोरबाळे यांना पुढील प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून यश संपादन करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पी. ए. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्रीडा शिक्षक तुषार जगताप, पी. एल. पाटील, जाधव मॅडम, निंबाळकर सर, पी. जी. पाटील, पाटील मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने घेतला.













