Edition

एमपीएससीच्या परीक्षा ऑफलाइनच घ्याव्यात; जयंतराव पाटील यांना निवेदन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वाळवा, प्रतिनिधी :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा गट-क २०२६ ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाला विरोध करत, सदर परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, अशी मागणी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदवीधर संघटनेच्या वतीने आमदार जयंतराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
२५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत संयुक्त पूर्व परीक्षा गट-क २०२६ ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, ऑनलाइन परीक्षांमधील नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात सातत्याने शंका व्यक्त होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांच्या अवघडपणातील फरकामुळे गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची भावना विद्यार्थ्यांची आहे. तसेच सर्व्हरमधील तांत्रिक अडचणी, संगणक प्रणालीवरील अवलंबित्व आणि परीक्षा केंद्रांवरील व्यवस्थापनातील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त मानसिक ताण निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ऑफलाइन पद्धतीत एकाच प्रश्नपत्रिकेद्वारे सर्व उमेदवारांची परीक्षा घेता येत असल्याने वेळ, मनुष्यबळ आणि खर्चाची बचत होते. सन २०२३ मध्ये सुमारे सात हजार पदांच्या भरतीसाठी संयुक्त गट-क पूर्व व मुख्य परीक्षा यशस्वीरीत्या ऑफलाइन पद्धतीने पार पडल्या होत्या. त्यामुळे आजही ऑफलाइन परीक्षा घेणे शक्य असल्याचे विद्यार्थ्यांनी अधोरेखित केले.
संयुक्त पूर्व परीक्षा गट-क २०२६ ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावी, तसेच सन २०२७ पासून एमपीएससीच्या गट-अ, गट-ब आणि गट-क संवर्गातील सर्व पूर्व व मुख्य परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार जयंतराव पाटील यांच्यामार्फत शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे करण्यात आली आहे.
यावेळी पदवीधर तालुकाध्यक्ष अभिजीत शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष विशाल सूर्यवंशी, संग्रामसिंह पाटील, डॉ. शैलेश पाटील, उद्धव पाटील, अरुण पाटील तसेच मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षा विद्यार्थी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!