Edition

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त वाशिम पोलिसांतर्फे चित्रकला स्पर्धा; अमली पदार्थमुक्त जिल्ह्यासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा प्रतिनिधी : संतोष भालेराव
वाशिम : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने २६ जून रोजी विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेद्वारे अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत समाजात जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.
पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी “अमली पदार्थांचे दुष्परिणाम”, “व्यसनमुक्ती” आणि “सुदृढ समाज” या विषयांवर प्रभावी चित्रे साकारली. उत्कृष्ट चित्रांची निवड करून विजेत्या विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की, अमली पदार्थांचे सेवन केवळ व्यक्तीच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंब आणि समाजासाठी घातक आहे. त्यामुळे जिल्ह्यात अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या सप्लायर्स व पेडलर्स विरोधात कठोर कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
पालकांनी आपल्या पाल्यांच्या बदलत्या सवयी आणि मित्रपरिवारावर बारकाईने लक्ष ठेवावे.
परिसरात अमली पदार्थांची विक्री, साठा किंवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी.
माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.
“अमली पदार्थांना नकार द्या आणि जीवनाला होकार द्या (Say No to Drugs, Say Yes to Life)” हा संदेश देत वाशिम जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
सदर उपक्रम पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक लता फड मॅडम, पोलीस उपअधीक्षक (गृह) केशव वाघ, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोउपनि प्रल्हाद पडघान तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!