सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांना कर्ज पुरवठा केल्याचा ठपका ठेवत रिझर्व बँकेने जिल्हा बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अशी माहिती भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक कारभाराचा अनागोंदी आणि भोंगळ तसेच भ्रष्टाचारी चेहरा या निमित्ताने समोर आल्याचा आरोप सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. यापूर्वी भाजपा सरकार असल्याने जिल्हा बँकेवर प्रशासक लागू शकतो असा आमच्यावर आरोप केला जात होता . मात्र आता थेट रिझर्व बँकेकडूनच संचालकांना कर्ज वाटप केल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आले आहेत. 24 जून रोजी जिल्हा बँकेला नोटीस येऊन सुद्धा याबाबत कोणतीही वाच्यता बँकेकडून करण्यात आली नाही त्यामुळे विहित मुदतीत जिल्हा बँकेच्या प्रशासनाने संचालकांना दिलेल्या कर्जाबाबत खुलासा द्यावा लागणार आहे. मात्र सहकार कायद्यानुसार कोणत्याही बँकेच्या संचालक किंवा त्याच्या नातेवाईकांना त्या बँकेचे कर्ज देता येत नाही असा नियम आहे मात्र सांगली जिल्हा बँकेने या नियमाची पायमल्ली करत बेकायदेशीरपणे संचालकांना व त्यांच्या संस्थांना कर्ज दिल्याचे समोर आले आहे. बँकेच्या या अनियमित कारभारामुळे जिल्हा बँकेवर प्रशासक लागणार हे जवळजवळ निश्चित असल्याचेही आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. ज्यांनी ज्यांनी संचालक असताना या बँकेतून कर्ज घेतले आहेत त्यांची कर्ज ही वसूल केली जातील असे गोपीचंद पडळकर म्हणाले.











