Edition

CETP चे पाणी थेट ओढ्यात; पाहणीत धक्कादायक प्रकार उघड. पोलखोल होताच प्रोसेस मालकांची दादागिरी; पंचनामा सुरू असतानाच पाहणी बंद पाडण्याचा प्रयत्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिरोळ / प्रतिनिधी
पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आज झालेल्या संयुक्त पाहणीत CETP चे पाणी थेट ओढ्यात सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आंदोलकांनी हा प्रकार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित प्रोसेस मालकांची अक्षरशः पोलखोल झाली.या प्रकाराचा पंचनामा सुरू होताच बिथरलेल्या प्रोसेस मालकांनी कामगारांना पाचारण करून पाहणी बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पंचगंगा प्रदूषणाच्या संदर्भात CETP मधील प्रक्रिया केलेले पाणी ज्या शेती क्षेत्रात सोडले जात असल्याचा दावा केला जात आहे, त्या क्षेत्राची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी आज प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभाग, आंदोलक आणि प्रोसेस मालक यांच्या उपस्थितीत संयुक्त पाहणी करण्यात आली. सकाळपासून सुरू असलेल्या या पाहणीत सुमारे ९० एकर क्षेत्राची तपासणी करण्यात आली.

मात्र, प्रत्यक्ष पाहणीत धक्कादायक वास्तव समोर आले. तपासणी केलेल्या ९० एकरपैकी केवळ २५ एकर क्षेत्रातच पाणी सोडले जात असल्याचे आढळले, तर उर्वरित बहुतांश क्षेत्र कोरडे असून त्या ठिकाणी आजपर्यंत पाणीच पोहोचले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रोसेसधारकांकडून शेतीसाठी पाण्याचा वापर होत असल्याचे केले जाणारे दावे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

याच दरम्यान काही ठिकाणी पाईपलाईनद्वारे CETP चे पाणी थेट ओढ्यात सोडले जात असल्याचे आंदोलकांच्या निदर्शनास आले. हा प्रकार अधिकाऱ्यांना दाखवून देताच संबंधित ठिकाणाचा पंचनामा करण्यात आला. त्यामुळे अनेक दिवसांपासून होत असलेल्या प्रदूषणाबाबतच्या तक्रारींना बळ मिळाले आहे.

दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काही प्रोसेस मालक आणि त्यांच्या कामगारांनी पाहणीमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांशी हुज्जत घालत दादागिरीचे प्रकार करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. मात्र, आंदोलकांनी ठाम भूमिका घेत पाहणी पूर्ण करण्याची मागणी केली.

आजची पाहणी अपूर्ण राहिल्याने उर्वरित क्षेत्राची तपासणी उद्या करण्यात येणार असून त्यानंतर संपूर्ण अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. या अहवालाकडे आता पंचगंगा प्रदूषण प्रकरणातील पुढील कारवाईच्या दृष्टीने सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!