कोल्हापूर प्रतिनिधी – मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करवीर पोलिसांकडून वडणगे येथे दंगल काबू योजना प्रात्यक्षिक आणि रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.
दि. 17 जून 2026 रोजी सायंकाळी करवीर पोलीस ठाणे हद्दीतील श्री शिवपार्वती चौक, वडणगे येथे पोलिसांची दृश्यमानता वाढविण्याच्या उद्देशाने दंगल काबू योजना प्रात्यक्षिक पार पडले. यानंतर पार्वती चौक–पार्वती गल्ली, शिवाजी चौक, दुकान गल्ली, ग्रामपंचायत चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मिलिंद नगर, प्रिस्टन चर्च, कागद कारखाना परिसर, माळवाडी, श्री वल्लीसो दर्गा, गणेश मंदिर चौक, जय भवानी चौक तसेच मुख्य बाजारपेठ या मार्गांवर रूट मार्च काढण्यात आला.
रूट मार्चनंतर उपस्थित नागरिकांना दंगल काबू योजना प्रात्यक्षिकाचा आशय, उद्देश आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली. यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत झाली.
या उपक्रमात 5 पोलीस अधिकारी, 19 पोलीस अंमलदार आणि 71 होमगार्ड सहभागी झाले होते.
यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे, शंकर कळकुटे आणि खंडेराव कोळी यांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते.











