Edition

कोल्हापूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई; म्युल बँक अकाऊंट रॅकेटचा पर्दाफाश.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर, प्रतिनिधी : सायबर फसवणुकीत वापरल्या जाणाऱ्या “म्युल बँक अकाऊंट” प्रकरणावर कोल्हापूर सायबर पोलिसांनी प्रभावी कारवाई करत एका संघटित रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीतून मिळालेली रक्कम विविध व्यक्तींच्या बँक खात्यांमध्ये वळती करून त्यानंतर ती रक्कम इतर खात्यांत हस्तांतरित करणे, रोख स्वरूपात काढणे किंवा क्रिप्टोकरन्सीत रूपांतरित करण्यासाठी अशा खात्यांचा वापर केला जातो. या खात्यांना “म्युल बँक अकाऊंट” असे संबोधले जाते.
सायबर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी अशा खात्यांचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती व टोळ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी तांत्रिक तपास सुरू केला.
तपासादरम्यान दर्शन रघुनाथ बचाटे याच्याकडून माहिती मिळाली की, प्रथमेश पंडित मिरजकर याने शेअर मार्केटमधील परताव्याच्या नावाखाली विविध व्यक्तींची बँक खाती उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले होते. त्याबदल्यात संबंधितांना रोख कमिशन देण्याचे आमिष दाखविण्यात येत होते.
पुढील तपासात प्रथमेश पंडित मिरजकर, अनिकेत धोंडीराम कुंभार, श्रीदत्त विनोद कांबळे, सिद्धेश हरिदास मुसळे, साहिल खंडू शेख, मयुरेश विकास कोरडे आणि सागर धनंजय भंडारी यांच्यासह इतरांनी संगनमताने अनेक नागरिकांची बँक खाती उघडून घेतल्याचे निष्पन्न झाले. प्रत्येक खाते उपलब्ध करून दिल्यास दोन हजार ते दहा हजार रुपये कमिशन मिळेल, अशी खोटी माहिती देऊन नागरिकांना जाळ्यात ओढण्यात येत होते.
या खात्यांचा वापर प्रत्यक्षात सायबर फसवणुकीतील रकमेची विल्हेवाट लावण्यासाठी केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 376/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 316, 318(4) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतिश म्हेत्रे करत आहेत. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
नागरिकांना आवाहन
कोणतीही व्यक्ती बँक खाते भाड्याने देण्यास, वापरण्यास किंवा त्यासोबत मिळणारे एटीएम कार्ड, चेकबुक, पासबुक अथवा नेट बँकिंग सुविधा इतरांना देण्यासाठी प्रोत्साहित करत असल्यास अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. अशा खात्यांचा वापर सायबर गुन्ह्यांसाठी होऊ शकतो आणि खातेदारालाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता बाळगावी, असे आवाहन कोल्हापूर सायबर पोलिसांनी केले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!