कोल्हापूर, प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टी, ‘दिव्यांग आघाडी विदर्भ विभागप्रमुख’ तथा ‘दिव्यांग जनसंवाद फौंडेशन’ चे राष्ट्रीय अध्यक्ष अम्मोल वाळके २ दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेत दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करत निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांगांची पेन्शन प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आत जमा करावी, महाराष्ट्रातील प्रत्येक मोठ्या शहरात दिव्यांगांना किमान १०० व्यावसायिक केबिन उपलब्ध कराव्या, प्रत्येक शहरात दिव्यांगांना किमान २७०० ई – रिक्षा व १००० ई – स्कुटी वितरित करण्यात याव्यात, दिव्यांगांना मासिक ६००० रुपये पेन्शन मिळावी, पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवी पूर्ण झालेल्या दिव्यांगांना शासकीय नोकरीत घ्यावे अथवा मासिक ‘पंधरा हजार’ मानधन द्यावे. व्यवसायासाठी ‘२०० स्केअर फूट’ जागेच्या शासन निर्णयातील अटी शिथिल कराव्यात, राज्य परिवहन बसेस मध्ये दिव्यांगांना १००% सवलत द्यावी, शासनाच्या विविध दिव्यांग संबंधी विभागात दिव्यांगांना ७०% जागा आरक्षित कराव्या या प्रमुख मागण्यांसह ५४ मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या.
खासदार महाडिक यांनी दिव्यांगांच्या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या संसदेत मांडण्याचा शब्द दिला. तसेच मागण्या पूर्णत्वास जाईपर्यंत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी असंघटित दिव्यांग सेलचे राज्याध्यक्ष प्रकाश सरनाईक, भारतीय जनरल कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष अभिजीत ढवण, जिल्हाध्यक्ष विवेक पाटील, दिव्यांग कार्याध्यक्ष अक्षय सुर्वे, शहरप्रमुख करण माळी, प्रसिद्धीप्रमुख सागर कांबळे, पुणे फौंडेशन जिल्हाध्यक्ष राहुल बोडखे, सचिन पोतदार, जी. आर. कांबळे, हुमायूं हिरवाडे, सुभाष शिंगाडे, मार्तंड कांबळे, जयसिंग वडगावे आदी उपस्थित होते.











