अ.लाट येथे ग्रासरूट लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्साहात संपन्न; अनिता कुरणे यांच्या दिव्यांगांसाठीच्या कार्याचे मान्यवरांकडून कौतुक.
अब्दुल लाट : प्रतिनिधी
रमा माता ग्रामीण महिला विकास महामंडळ आणि कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने अब्दुल लाट येथे ग्रासरूट लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान उंचावणे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचे हक्क व अधिकार यांची जाणीव करून देणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती शिरोळचे सभापती मिलिंद कुरणे, लाटवाडीचे सरपंच तसेच जिल्हा परिषद सदस्या श्रद्धा गायकवाड उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती मिलिंद कुरणे यांनी दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका मांडली. पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येणारे दिव्यांगांसाठीचे सर्व हक्क, योजना आणि सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करू. दिव्यांगांच्या हिताचे जे काही निर्णय पंचायत समितीच्या माध्यमातून घेता येतील, ते लवकरात लवकर घेऊन दिव्यांगांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. तसेच भविष्यातही आपण सदैव दिव्यांगांच्या पाठीशी उभे राहू, असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अनिता कुरणे मॅडम आणि संगीता कांबळे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. विशेष म्हणजे अनिता कुरणे या स्वतः दिव्यांग असून एका पायाने दिव्यांग असतानाही स्वतःच्या अडचणींवर मात करून इतर दिव्यांग आणि निराधार व्यक्तींना आधार देण्याचे महान कार्य त्या करत आहेत. स्वतःला आधाराची गरज असतानाही इतरांच्या जीवनात आधार बनून उभे राहण्याची त्यांची जिद्द आणि सामाजिक बांधिलकी खरोखरच प्रेरणादायी आहे. लाटवाडी, शिरदवाड आणि परिसरातील दिव्यांग व निराधार व्यक्तींसाठी त्या सातत्याने करत असलेले कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या कार्याचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे.
यावेळी श्री दत्त दिव्यांग व निराधार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, कु. सुशीला पुजारी प्रहार संघटनेचे पिरजादे साहेब, प्रदीप आयगुळे साहेब, सुधाकर तावदारे यांच्यासह कोरो इंडिया संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया कोळी यांनी केले. दिव्यांगांच्या प्रश्नांना समर्पित असलेला हा कार्यक्रम पाहून त्यांच्यामध्येही विशेष उत्साह निर्माण झाला. यापुढे दिव्यांग बांधवांसाठी कोणताही सामाजिक किंवा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला, तर सूत्रसंचालनासाठी मी नेहमी आपल्या सोबत असेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दिव्यांगांच्या विकासासाठी एकजुटीची गरज!
आज दिव्यांगांना केवळ सहानुभूतीची नव्हे, तर समान संधी, सन्मान, स्वावलंबन, रोजगार, राजकीय प्रतिनिधित्व आणि शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याची गरज आहे. त्यासाठी सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि राजकीय संघटनांनी एकत्र येऊन काम करणे काळाची गरज आहे.
शरदवाडी येथे आयोजित हा कार्यक्रम केवळ एक प्रशिक्षण कार्यक्रम न राहता दिव्यांगांच्या हक्कांसाठी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येण्याची सकारात्मक सुरुवात ठरला. दिव्यांगांच्या प्रश्नांना लोकप्रतिनिधींकडून मिळालेला प्रतिसाद आणि अनिता कुरणे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांची जिद्द निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.










