इचलकरंजी प्रतिनिधी प्रविण केर्ले,
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथे माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत बूथनिहाय नियोजन आणि संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात आला.
पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावंडे यांना बहुमताने विजयी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन, बूथनिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप, मतदारांशी संपर्क आणि संघटनात्मक समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी भाजपचे निरीक्षक नाशिकचे श्री. सावजी आणि महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी मार्गदर्शन केले. उपमहापौर अनिल डाळ्या, ज्येष्ठ नगरसेवक तानाजी पोवार, मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते, पै. अमृत भोसले, प्रसाद खोबरे यांच्यासह नगरसेवक, पक्षाचे विविध पदाधिकारी, बूथप्रमुख तसेच महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, प्रत्येक बूथवर प्रभावी नियोजन करावे आणि पदवीधर व शिक्षक मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. संघटनात्मक ताकद, बूथनिहाय नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या बळावर दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.











