Edition

करवीर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांकडून १३.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रतिनिधी : करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन इसमांविरुद्ध धडक कारवाई करत तब्बल १३ लाख ६९ हजार ५७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ४ लाख ५९ हजार ५७५ रुपयांची देशी-विदेशी दारू तसेच दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.
कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकाला अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
दिनांक १ जून २०२६ रोजी गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी विजय पाटील व सोमराज पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कळंबा हद्दीत कोल्हापूर-गारगोटी मार्गावरून निस्सान कंपनीच्या टेरानो (एमएच-१० बीआर-९७९७) या वाहनातून विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कळंबा नाका परिसरात सापळा रचून वाहनाची तपासणी केली असता, वाहनातून ३१ हजार ७०० रुपयांची विदेशी दारू आढळून आली. याप्रकरणी आरोपी शहाजी साताप्पा बरगे (वय ४८, रा. अर्जुनवाड, ता. राधानगरी) याच्याकडून वाहनासह ७ लाख ३१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, गुन्हे शोध पथकातील सुभाष सरवडेकर यांना मिळालेल्या दुसऱ्या गोपनीय माहितीनुसार, कोल्हापूर-राधानगरी मार्गावरून टाटा कंपनीच्या जीप एक्सेल टेंपो (एमएच-११ सीएच-४१५०) मधून देशी-विदेशी दारूची वाहतूक होत असल्याचे समजले. नवीन वाशी नाका येथे सापळा रचून वाहन अडविण्यात आले. तपासणीदरम्यान आरोपी मुबीन अजीज शेख (वय २६) याच्याकडून ४ लाख २७ हजार ८७५ रुपयांची देशी-विदेशी दारू आणि टेंपोसह ६ लाख ३७ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या दोन्ही कारवायांमध्ये मिळून ४ लाख ५९ हजार ५७५ रुपयांची दारू आणि दोन वाहनांसह एकूण १३ लाख ६९ हजार ५७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला मद्यसाठा गोल्डन वाईन्स, हॉकी स्टेडियम परिसर आणि मेरवाडे वाईन्स, सायबर चौक, कोल्हापूर येथून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधित वाईन शॉप मालकांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून त्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोसई नाथा गळवे, सुभाष सरवडेकर, रणजीत पाटील, विजय तळसकर, विजय पाटील, योगेश शिंदे, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण, सोमराज पाटील व श्रीधर जाधव यांनी पार पाडली.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

“मोजणीला आले तर रक्त सांडू”: ऐतवडे खुर्दचा शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध, शेतकरी नेते हनुमंत पाटलांचा सरकारला थेट इशारा.. 2019 च्या महापुरात 85% गाव पाण्याखाली, महामार्ग झाला तर 100% गाव बुडणार; “आम्ही आत्महत्या करणार नाही, लढू” – भूमिहीन होण्याच्या भीतीने शेतकरी आक्रमक.

traffic tail
error: Content is protected !!