
कोल्हापूर : डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्रोफेसर व डीन डॉ. विनायक गणपती पारळे यांची नुकतीच अमेरिकेतील सोसायटी फॉर एनर्जी मटेरिअल अँड सस्टेनेबिलिटी अर्थात ‘सेम्स’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्थेच्या प्रतिष्ठित ‘असोसिएट फेलो’ पदी निवड झाली आहे. ऊर्जा, प्रगत पदार्थ विज्ञान आणि शाश्वत तंत्रज्ञान या संशोधन क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
डॉ.पारळे यांना प्रगत पदार्थ विज्ञान, एरोजेल्स, ऊर्जा साठवण तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये व्यापक संशोधन अनुभव आहे. त्यांनी जपानमधील हिरोशिमा विद्यापीठ आणि दक्षिण कोरियातील योनसेई विद्यापीठ यांसारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये संशोधन कार्य केले आहे.
डॉ. पारळे यांच्या नावावर १३५ हून अधिक शोधनिबंध प्रकाशने असून त्यांच्या संशोधन कार्याला ४५०० हून अधिक सायटेशन्स प्राप्त झाले आहेत. त्यांच्या संशोधनाची जागतिक स्तरावर दखल घेत २०२५ मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि एल्सेव्हियर यांच्या जागतिक अव्वल दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
‘सेम्स’ ही ऊर्जा, प्रगत पदार्थ विज्ञान, शाश्वत विकास, जलतंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान या क्षेत्रांतील संशोधनाला प्रोत्साहन देणारी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्था आहे. या संस्थेमार्फत संशोधकांना जागतिक संशोधन समुदायाशी जोडणे, आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणे, ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि नवोदित संशोधकांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. असोसिएट फेलो हे सदस्यत्व संशोधन व नावीन्यपूर्ण कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संशोधकांना प्रदान केले जाते.
डॉ. विनायक पारळे यांची या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थेच्या असोसिएट फेलो म्हणून झालेली निवड ही महाराष्ट्राच्या संशोधन क्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या यशामुळे ऊर्जा साठवण, प्रगत पदार्थ विज्ञान आणि शाश्वत तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक व्यासपीठ उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या निवडीबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज डी. पाटील, प्र-कुलपती मा.ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ ए. के. गुप्ता व कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांनी त्यांचे अभिनंदन केले.










