शिराळा, प्रतिनिधी : वारणा नदीच्या खोऱ्यात ऑगस्ट व सप्टेंबर २०२६ मध्ये पर्जन्यमान कमी झाल्यामुळे नदीतील पाणीपातळीत लक्षणीय घट झाली आहे. तसेच अल-निनोच्या प्रभावामुळे उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध पद्धतीने वापर करणे आवश्यक असल्याने वारणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये आवश्यकतेनुसार बर्गे घालण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी मागणी शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित शिवाजीराव देशमुख यांनी केली आहे.
याबाबत आमदार देशमुख यांनी कोल्हापूर पाटबंधारे विभाग (३), कोल्हापूरच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी योग्य पद्धतीने उपयोग करण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
सध्या वारणा धरणातून विसर्ग सुरू असून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम तसेच जास्तीत जास्त उपयोग होणे गरजेचे आहे. शिराळा व वाळवा तालुक्यातील शेतीसाठी पाणीपुरवठा सुरळीतपणे उपलब्ध होण्यासाठी वारणा व मोरणा नदीवरील सर्व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये आवश्यकतेनुसार बर्गे घालण्यात यावेत, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी योग्य प्रकारे वापर व्हावा आणि पाण्याची कमतरता निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी भूमिका आमदार सत्यजित देशमुख यांनी मांडली आहे.
शिराळा व वाळवा तालुक्यातील शेती मोठ्या प्रमाणावर वारणा नदीच्या पाण्यावर अवलंबून असल्याने बंधाऱ्यांमध्ये बर्गे घालण्याची कार्यवाही वेळेत झाल्यास उपलब्ध पाण्याचा अधिक प्रभावीपणे उपयोग करता येणार आहे. त्यामुळे संबंधित पाटबंधारे विभागाने या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.











