


पुणे प्रतिनिधी – वाढदिवस म्हणजे केक कापणे, फुगे, जल्लोष आणि मित्र-मैत्रिणींची गर्दी, अशी सर्वसाधारण कल्पना असते. मात्र या पारंपरिक उत्सवाला वेगळा अर्थ देत नवोदित रील स्टार अश्विनी पवार यांनी आपला २४ वा वाढदिवस गरजूंना मदतीचा हात देत अत्यंत सामाजिक आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा केला.
पुण्यातील खराडी येथील संतुलन अनाथ आश्रमातील सुमारे दीडशे अनाथांना अन्नदान करण्यात आले. तसेच खराडी परिसरातील कालभैरव मंदिर येथे सुमारे तीनशे जणांनाही अन्नदान करण्यात आले. अशाप्रकारे अश्विनी पवार आणि त्यांच्या पतीने वाढदिवसाचा आनंद सुमारे ४५० गरजूंमध्ये वाटून सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श घालून दिला.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना, स्वतःच्या वाढदिवसाचा आनंद गरजू आणि वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. पती-पत्नीने एकत्रितपणे राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
अल्पावधीत सोशल मीडियावरील रील्सच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अश्विनी पवार यांच्यावर वाढदिवसानिमित्त मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, हितचिंतक आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. प्रत्यक्ष भेटींसह दूरध्वनी आणि सोशल मीडिया माध्यमातूनही त्यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा मिळाल्या.
लोकप्रियतेसोबत सामाजिक संवेदनशीलतेचे भान जपणाऱ्या अश्विनी पवार यांनी आपल्या वाढदिवसातून एक वेगळाच संदेश दिला—“स्वतःच्या आनंदापेक्षा इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यातच खरा वाढदिवस साजरा होतो!” या उपक्रमासाठी रोहन इबीतवार, विलास बंडगर, आरती पितळे, राहुल पवार आदींनी परिश्रम घेतले. पवार दाम्पत्याच्या या उपक्रमातून “आपला आनंद इतरांसोबत वाटला, तरच उत्सवाला खरा अर्थ प्राप्त होतो” हा संदेश अधोरेखित झाला











