
सांगली प्रतिनिधी – चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस सुरू असल्याने वारणा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज (24 जुलै) सकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार वारणा धरण 77.39 टक्के भरले असून धरणात एकूण 26.62 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
गेल्या 24 तासांत धरणातील पाणीसाठ्यात 0.78 टीएमसीची वाढ झाली आहे. धरणाची पाणीपातळी 618.30 मीटरपर्यंत पोहोचली असून उपयुक्त पाणीसाठा 19.74 टीएमसी (71.74 टक्के) इतका आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 21.00 टीएमसी (76.31 टक्के) होता.
पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे गेल्या 24 तासांत 94 मिमी पावसाची नोंद झाली असून हंगामातील एकूण पर्जन्यमान 3114 मिमीवर पोहोचले आहे. धरण परिसरात 64 मिमी पाऊस झाला असून हंगामातील एकूण पाऊस 1233 मिमी इतका झाला आहे.
धरणात सध्या 9005 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून त्यामुळे पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत धरणात 15.42 टीएमसी पाण्याची भर पडली आहे.
दरम्यान, धरण 77 टक्क्यांहून अधिक भरले असले तरी सध्या स्पिलवे, जलविद्युत केंद्र (PWH) किंवा कालव्यामार्गे कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. मात्र, धरणाचा पाणीसाठा 80 टक्क्यांच्या जवळ पोहोचल्याने प्रशासन सतर्क झाले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.










