Edition

यवतमाळ पोलीस कर्तव्य मेळावा-2026 : अमरावती रेंजमध्ये वाशीम जिल्हा उपविजेता; PI रामेश्वर चव्हाण यांना सुवर्णपदक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा प्रतिनिधी : संतोष भालेराव, वाशिम : यवतमाळ येथे पार पडलेल्या पोलीस कर्तव्य मेळावा-2026 मध्ये अमरावती रेंजमधून वाशीम जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत वाशीम जिल्ह्याने एकूण 18 पदकांची कमाई केली. त्यामध्ये 6 सुवर्ण, 8 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे.
वाशीम जिल्हा संघाचे प्रमुख तथा समन्वय अधिकारी पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली संघाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे वाशीम जिल्ह्याने अमरावती रेंजमध्ये मानाचे स्थान मिळवले.
विशेष म्हणजे ‘Crime Investigation, Criminal Laws, Rules, Procedure & Court Judgements Written Test’ या लेखी स्पर्धेत पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी उत्कृष्ट यश संपादन करत सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या या यशामुळे वाशीम जिल्हा पोलीस दलाच्या अभ्यासू वृत्तीची आणि व्यावसायिक क्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली.
याशिवाय जिल्ह्यातील आणखी 17 पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांनी विविध स्पर्धांमध्ये पदके मिळवून वाशीम जिल्ह्याच्या यशात मोलाची भर घातली. या दमदार कामगिरीमुळे वाशीम जिल्हा पोलीस दलाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
दरम्यान, रिसोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने धडक कारवाया केल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींवर कारवाई करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे रिसोड पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
पोलीस कर्तव्य मेळाव्यातील या यशामुळे वाशीम जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत आणखी भर पडली असून, भविष्यातही अशीच उल्लेखनीय कामगिरी कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संतोष भालेराव सह नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!