Edition

अतिमुसळधार पावसाचा इशारा! मुंबई, पुणे, रायगडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई | प्रतिनिधी : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होत असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. मुंबईत सोमवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली, तर आजही अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, रोहतक–वाराणसी–पुरुलिया ते ईशान्य बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, सुमारे 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. याचबरोबर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा ते बंगालपर्यंतही कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील इतर भागांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. सध्या धरण 82.42 टक्के भरले असून, गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 77.28 टक्के होता. गेल्या 24 तासांत पाणलोट क्षेत्रात 46 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भातही नागपूरसह अनेक भागांत सकाळपासून संततधार पाऊस सुरू असून, पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
जूनच्या अखेरीस राज्यात दाखल झालेल्या मान्सूनने जुलैमध्ये दमदार हजेरी लावली होती. मात्र काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, पुढील काही दिवस राज्यभर पावसाचा प्रभाव कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तरेकडील अनेक राज्यांमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, महाराष्ट्रातही सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!