
अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आपल्या २० वर्षांहून अधिक जुन्या **’स्विफ्ट स्पेस टेलिस्कोप’**ला वाचवण्यासाठी ऐतिहासिक बचाव मोहीम राबवणार आहे. दीर्घकाळ अवकाशात कार्यरत असलेला हा उपग्रह सध्या आपली निर्धारित कक्षा हळूहळू गमावत पृथ्वीच्या दिशेने खाली येत आहे. वेळेत त्याची कक्षा उंचावली नाही, तर पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना तो जळून नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सन २००४ मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेला स्विफ्ट टेलिस्कोप आजही ब्रह्मांडातील गामा-रे बर्स्ट, सुपरनोव्हा आणि इतर उच्च-ऊर्जेच्या खगोलीय घटनांचे निरीक्षण करून वैज्ञानिकांना महत्त्वपूर्ण माहिती पाठवत आहे. दोन दशकांनंतरही त्याची कामगिरी प्रभावी असल्याने नासा हा उपग्रह कोणत्याही परिस्थितीत गमावू इच्छित नाही.
दीर्घकाळाच्या वापरामुळे स्विफ्टची बॅटरी कमकुवत झाली असून सौर पॅनेल्सची कार्यक्षमताही घटली आहे. त्यामुळे त्याच्या कक्षेवर परिणाम झाला आहे. ही समस्या दूर करण्यासाठी नासाने ‘कॅटॅलिस्ट स्पेस टेक्नॉलॉजी’ या कंपनीची निवड केली असून, कंपनी विशेष बूस्टर सिस्टमच्या मदतीने उपग्रहाला पुन्हा सुरक्षित आणि उंच कक्षेत पोहोचवणार आहे.
या बचाव मोहिमेवर सुमारे ३०० अब्ज डॉलर्स (भारतीय चलनानुसार ३० हजार कोटी रुपयांहून अधिक) खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. मोहिमेसाठी ‘पेगासस’ रॉकेटचा वापर करण्यात येणार असून, एखाद्या जुन्या वैज्ञानिक उपग्रहाला वाचवण्यासाठी अशा प्रकारची मोहीम राबवली जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याने अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
नासाचे विज्ञान प्रमुख निक फॉक्स यांनी सांगितले की, स्विफ्ट आजही मौल्यवान वैज्ञानिक माहिती पुरवत आहे. त्यामुळे सप्टेंबर २०२६ पर्यंत त्याची कक्षा सुधारून ऑक्टोबर २०२६ पर्यंत संपूर्ण बचाव मोहीम पूर्ण करण्याचे नासाचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेकडे जगभरातील अंतराळ वैज्ञानिकांचे लक्ष लागले आहे.











