
कोल्हापूर प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील दोन सदस्यांचे जातवैधता दाखले अवैध ठरून त्यांना अपात्र ठरविण्यात आल्यानंतर आता त्याचे पडसाद कोल्हापूर महानगरपालिकेतही उमटले आहेत. भाजपचे नगरसेवक रिंकू उर्फ विजय देसाई यांचा कुणबी समाजाचा जातवैधता दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरविल्याने त्यांच्या नगरसेवक पदावर संकट निर्माण झाले आहे.
प्रभाग क्रमांक ९ मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले रिंकू उर्फ विजय देसाई यांच्या जातवैधता प्रमाणपत्राबाबत जात पडताळणी समितीने आज निर्णय दिला. या निर्णयामुळे त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले असून, कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
या संदर्भात संपर्क साधला असता, रिंकू उर्फ विजय देसाई यांनी जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, महापालिकेतील आणखी काही नगरसेवकांच्या जातवैधता प्रमाणपत्रांबाबतही जात पडताळणी कार्यालयाकडे तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी काही निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत असून, कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात या प्रकरणामुळे मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.











