वाळवा प्रतिनिधी – चिकुर्डे, ता. वाळवा : येथील कुमार भिमराव भोसले (वय ५९) यांचा सोमवारी (दि. २९) दुपारी विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुमार भोसले हे वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. गेल्याच वर्षी ते सेवेतून निवृत्त झाले होते.
सोमवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ते घराजवळील शेडमध्ये गेले असता, तेथील वीज जोडणीचा तीव्र धक्का बसल्याने ते जागीच कोसळले. घटनेची माहिती मिळताच गावातील खासगी डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी प्रवीण भोसले यांनी कुरळप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मृत कुमार भोसले यांच्या पश्चात वडील, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने चिकुर्डे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.











