
वाई : प्रतिनिधी – दि २९-६-२०२४
शाहू छत्रपती फाऊंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित राजर्षी शाहू आदर्श शिक्षक व विशेष उल्लेखनीय पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी, दि. २८ जून रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन (मिनी सभागृह), कोल्हापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या प्रतिष्ठित सोहळ्यात किसन वीर महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. शिवाजीराव कांबळे यांना शिक्षण, वाचनसंस्कृती संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि ज्ञानसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल “राजर्षी छत्रपती शाहू महाराज विशेष पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. हा पुरस्कार इतिहास संशोधिका प्रा. डॉ. मंजुश्री पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारामुळे किसन वीर महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आली. प्रा. डॉ. कांबळे यांनी ग्रंथपाल म्हणून केवळ पुस्तके जपण्याचे कार्य न करता विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी, अभ्यासाभिमुख वातावरण घडवण्यासाठी आणि ज्ञानसंपन्न पिढी घडवण्यासाठी सातत्याने मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांनी प्रा. डॉ. कांबळे यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी आणि संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. याशिवाय किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे यांनीही प्रा.डॉ. कांबळे यांचे अभिनंदन करून हा पुरस्कार महाविद्यालयासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रा.डॉ. कांबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
पुरस्कार स्वीकारताना प्रा.डॉ. शिवाजीराव कांबळे यांनी हा सन्मान वैयक्तिक नसून शिक्षण आणि ज्ञानसेवेसाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक शिक्षक, ग्रंथपाल आणि शिक्षण क्षेत्रात कर्तव्यनिष्ठेने काम करणाऱ्यांचा असल्याची भावना व्यक्त केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना पुढे नेणे हीच या सन्मानाची खरी परतफेड असेल, असे त्यांनी नमूद केले.
या सन्मान सोहळ्याला शिक्षण, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. प्रा. डॉ. शिवाजीराव कांबळे यांच्या या यशस्वी सन्मानाबद्दल सर्वत्र आनंद व अभिमान व्यक्त होत आहे.











