
हातकणंगले प्रतिनिधी : खोतवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राहुल महादेव कांबळे यांची सोमवारी (दि. 22 जून 2026) बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून निवडीनंतर वाजत-गाजत मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला.
मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच विशाल पोपट कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. एकूण 16 सदस्यांपैकी 13 सदस्य उपस्थित राहिल्याने कोरम पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले.
उपसरपंच पदासाठी राहुल महादेव कांबळे यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाला होता. अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने राहुल कांबळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी तथा सरपंच विशाल कुंभार यांनी जाहीर केले. निवडीची घोषणा होताच उपस्थित सदस्य व ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. उपस्थितांनी नूतन उपसरपंच यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
या सभेला ग्रामपंचायत सदस्या श्रीमती निर्मला सुनील खोत, सौ. शिल्पा वैभव पोवार, सुजाता दत्तात्रय स्वामी, देवकी नामदेव शिंदे, माधुरी गणेश सुतार, अजय श्रीकांत डुबल, नरेंद्र रविंद्र पोटे, गजानन विलास नलगे, उत्तम नामदेव सासणे, रियाज अमिर चिकोडे, सावंता आकाराम माने, आदी सदस्य उपस्थित होते. सभेचे सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी व्ही. आर. ठिकणे यांनी कामकाज पाहिले. यावेळी भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेचे माजी सचिव सचिन पोवार, बापू चोपडे, सचिन कांबळे, संजय चोपडे, महादेव कांबळे, विजय खोत, रवी सासणे, अर्जुन राजपूत, अमर खोत, सतीश जुगूळकर, शुभम खोत, वैभव पवार, दीपक माने, रोहन माने, दादा खोत, करण खोत यांच्यासह गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने निवड झालेल्या उपसरपंच राहुल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.













